तरूणींच्या स्वप्नात राजकुमार येतात, सुखी संसाराची स्वप्नं येतात आणि बरंच काय काय येतं. काहींना भुताखेतांची स्वप्नं पडतात तर काहींना गाडी बंगल्याची. पण मला हल्ली ही असली स्वप्नं पडतात-
'गाव तिथे अणुभट्टी झालीच पाहिजे' या मागणीसाठी अण्णा ढमाले यांनी केलेलं आमरण उपोषण अखेरीस या प्रकल्पाला मान्यता मिळवून आणि हेवी वॉटरचा घोट घेऊन पार पडलं. त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. सर्व वर्तमानपत्रांनी त्याला मनसोक्त प्रसिद्धी दिली. अण्णा न्यूक्लियर आयकॉन म्हणून ठिकठिकाणी झळकले.
आता गाव तिथे अणुभट्टी तयार करायची म्हणजे त्यासाठी कायदा हवा. मग मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत अण्णा ढमाले, रामदासबाबा अशा कुणाकुणाचा समावेश झाला. यथावकाश प्रत्येक गावात अणुभट्टी उभारली गेली. सर्वात मोठा प्रश्न होता तो निधीचा. सरकारच्या शिखर बँकेचं दिवाळं निघालं असल्याने आता काय करायचं असा प्रश्न पडला होता. मग ठरलं, महिला बचत गटांनी त्यासाठी सुलभ हप्त्यांनी कर्जपुरवठा करायचा. खासदार रुपप्रिया मुळे यांनी त्यांच्या महिला समूहांना त्यांनी विकलेल्या नासक्या दिवाळी फराळातून मिळालेले पैसे जमा करण्याचं आवाहन केलं. त्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
झालं. निधीचा प्रश्न तर सुटला. मग प्रश्न होता कच्च्या मालाचा. मग रेशनकार्डावर युरेनियम २३५ आणि २३८ चे साठे उपलब्ध करून देण्यात आले. त्यातही दारिद्रयरेषेखालच्या लोकांना प्राधान्य देण्यात आलं. जिथे दुर्गम आणि डोंगराळ भाग होते तिथे थोरियमपासून युरेनियम तयार करण्याचे महिलांचे कुटिरोद्योग सुरू करण्यात आले. मग हेवी वॉटर कुठून आणणार? ते घरातल्या नळाला उपलब्ध करून देण्यात आलं. कोळसाही रेशनकार्डावर मिळू लागला. बोरॉन, कॅडमियम, बोरॅलियम या धातूंच्या कांड्या घराघरांमध्ये उसनवार देण्यात येऊ लागल्या. आयाबाया घरात साखर संपलीय, वाटीभर देता का, असं न विचारता कॅडमियम संपलंय, माल कस्टममध्ये अडकलाय, ऊसना देता का, असं विचारू लागल्या.
मग प्रश्न होता तो प्रशिक्षित कर्मचार्यांचा. त्यासाठी शाळाशाळांमधून अणूच्या संमीलनाचे आणि केंद्रकीय विखंडनाचे धडे देण्यात येऊ लागले. अभ्यासक्रमांमध्ये त्याशिवाय दुसरं काहीच शिकवेनात. त्यासाठीचं प्रशिक्षण थेट अणुभट्टीत देण्यात येऊ लागलं. अणूऊर्जेतून निर्माण होणारं रेडिएशन भंगारचा एक 'आयटम' म्हणून मान्यताप्राप्त झालं. भंगारवाले आता ' डब्बा, बाटली, रेडिएशन भंगारवाला' असं ओरडू लागले.
त्या त्या गावाचं नाव अणुभट्टीला देण्यात आलं. उदा. सासवडे बुद्रुक अणुभट्टी प्रकल्प. अणुभट्टी संचालक मंडळांमध्ये सरपंच निवडून देण्यात आले. सर्वाधिक रेडिएशन करणार्या अणुभट्ट्यांना सर्वोत्तम गाव पुरस्कार देण्यात येऊ लागला. ही योजना देशभरात राबवण्यात यावी यासाठी भारत सरकारकडे शिफारस केली. त्याची फाईल सध्या 'प्रतीक्षाधीन' आहे.
हे स्वप्न पडलं आणि मी दचकलेच. पण गंमतही वाटली. तुम्हाला काय वाटतं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा