गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

कोंदणातला हिरा- निशांत घाटगे

माणसं... कितीतरी माणसं... आपल्या आजूबाजूला, इकडेतिकडे सगळीकडे माणसंच माणसं... प्रत्येकाचा रंग वेगळा, रूप वेगळं, आवाज वेगळा, बोलण्याची, उभं राहण्याची पद्धत वेगळी, अगदी पायाच्या बोटापासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत एका माणसाचं काहीही दुसर्‍यासारखं नाही. असं असेल तर प्रत्येकच माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा असायला हवा, आपल्या आयुष्याला काहीतरी वेगळं देणारा हवा... असं होत मात्र नाही. असाच एक माणूस मला अचानक गवसला, होय गवसलाच... मी सापडला म्हणणार नाही. कारण सापडला म्हटलं की तो नुसताच सापडतो, एखादी वस्तू सापडल्यासारखा... पण मला हा गवसला एखादा हिरा गवसल्यासारखा! त्याचं नाव? निशांत अण्णासाहेब घाटगे... वय? त्याच्याशी आपल्याला काय करायचं? बरं मग त्याच्यात वेगळं ते काय? तेच तर सांगण्यासारखं आहे...

बरं हा गवसला कसा? तर ते आधी सांगते... दीडेक वर्षापूर्वी मला पंढरपूरची वारी पाहण्याची अतोनात इच्छा झाली होती. एका दिवशी अचानक ठरवून एका मित्रासोबत गेलेसुद्धा! तिकडे तीन दिवस अत्यंत आनंदात घालवले. साम मराठीमध्ये पत्रकार असलेल्या या मित्राने मला एक कहाणी सांगितली... सुमारे वीसेक वर्षांपूर्वी आलेला पंढरीची वारी नावाचा एक उत्कृष्ट सिनेमा कुणी पाहिलाय की नाही मला माहीत नाही. अशोक सराफ, जयश्री गडकर यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करतानाची भूमिका होती. सांगलीच्या अण्णासाहेब घाटगेंनी हा सिनेमा बनवला... त्यासाठी त्यांना जे कष्ट उपसावे लागले त्याला तोड नाही. शरद तळवलकरांची पटकथा असलेला हा सिनेमा आधी दोन-तीन निर्मात्यांनी घेऊन परत केला होता... तो सुरू करायच्या आधीच अशा काही घटना घडायच्या की त्यांना तो बनवताच आला नाही. घाटगेंनी तो बनवायचं आव्हान स्वीकारलं. तो बनवायला घेतला. त्यासाठी आपल्या हातात असलेले इतर सर्व सिनेमे त्यांनी बाजूला ठेवले. अरूण सरनाईक, रंजना अशी स्टारकास्ट ठरली. आता वारीवरचा सिनेमा आहे तर तो वारीतच जाऊन तयार केला पाहिजे. म्हणजे केवळ अकरा दिवसात त्याचं शूटिंग झालं पाहिजे.. शेवटी ठरलं... वारीच्या आदल्या दिवशी पुण्यात सुरूवात करायची. अरूण सरनाईक यायला निघाले, त्यांच्या गाडीला अपघात आणि त्यांचं निधन... झालं! प्रथमग्रासे मक्षिकापात, असला प्रकार!

आता काय करायचं? त्या वर्षी सिनेमाची सुरूवात होऊ शकली नाही. नंतर करायची असं ठरलं. नवीन हिरो, नवीन हिरॉइन हवी. बरं यानंतर कुणी यायला तयार नव्हतं. मग अशोक सराफ आले. रंजना आल्या. सिनेमा पुन्हा सुरू झाला. पण तो जवळपास ६०-७० टक्के पूर्ण झाला आणि रंजनाबाईंचा तो प्रसिद्ध अपघात झाला. सिनेमा पुन्हा ठप्प झाला. रंजनाबाई आज ना उद्या बर्‍या होतील, चालू शकतील आणि पुन्हा सिनेमा सुरू होईल असा विश्वास अण्णासाहेबांना होता. पण ते झालं नाही. बरेच दिवस गेले. नवीन हिरॉइन आणायची तर नव्याने सगळं करावं लागणार होतं. त्यांनी केलं... पुन्हा शोधाशोध केली... पण हे दोन अपघात पाहता आता मात्र हा सिनेमा करणं म्हणजे आपल्या जीवावर बेतण्यासारखं आहे असं अनेकांना वाटत होतं. तरीही जयश्री गडकर तयार झाल्या. मग विठ्ठलाची भूमिका केलेल्या मुलाचं, गडकरांच्या मुलीचा रोल केलेल्या त्या मुलीचं वय लपवण्याची कसरत करावी लागली. तिने दरम्यानच्या काळात लग्न तर केलं होतं पण सिनेमा पूर्ण होईपर्यंत मूल होऊ दिलं नाही. कित्येक वर्षांनी खूप कष्ट करून हा सिनेमा तयार झाला. त्यासाठी अण्णासाहेबांना तुडुंब कर्ज झालं होतं. घरात वारीचं इतकं वातावरण होतं की नॉनव्हेज खाणंच बंद झालं... या संपूर्ण कुटुंबाचं जगणंच बदलून गेलं...

ही कहाणी ऐकल्यावर मला निशांतला भेटायची आणि त्यावर स्टोरी करायची इच्छा झाली. त्याला शोध शोध शोधलं. थँक्स टू फेसबुक... शेवटी मिळालाच. त्याच्याशी बोलून पूर्ण कहाणी जाणून घेतली, त्यावर लेख लिहून तो छापला. पण हे सगळं तिथेच थांबलं नाही. मला हा मुलगा काहीतरी वेगळा आहे असं सारखं जाणवत होतं. एक-दोनदा भेटलो. त्याचं सिनेमावेड अगदी रक्तात भिनलेलं आहे. वडिलांकडून मुलांना मालमत्तेचा, संपत्तीचा वारसा मिळतो. याला मिळालं चित्रपटवेड आणि अचाट कल्पनाशक्ती... डोळ्यांत स्वप्नं आणि भवदिव्य करण्याचा ध्यास... त्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसायची आणि कुठलीही परिस्थिती पार करायची तयारी, हे देखील त्याच्या रक्तातच.

याच वेडातून त्याने चैतन्य रसिक कला मंच नावाची संस्था दहा वर्षांपूर्वी स्थापन केली. वर्षाकाठी प्रेक्षकांकडून एक रक्कम घ्यायची आणि त्यांना ठराविक नाटकं आणून दाखवायची, अशी ती योजना. सुरूवातीच्या काळात ४५ असलेल्या प्रेक्षकांची संख्या आता ५५० वर गेलीय, ती वाढत चाललीय. सांगलीत ही गोष्ट उल्लेखनीयच म्हणायला हवी. तिकडे नाटक आणि निशांत असं समीकरणच रूढ झालंय. पण त्यासाठी त्याने काही कमी मेहनत केलेली नाही. भरत जाधवचा वाढदिवस साजरा करणं, सांगलीत सही रे सहीच्या ४६५ किंवा अशाच कुठल्यातरी प्रयोगाला भरत जाधवला तेवढ्याच फुलांचा गुच्छ समारंभपूर्वक देणं असलं काहीतरी तोच करू शकतो, असं त्याचे मित्र म्हणतात. त्याला सिनेमा बनवायचा आहे. तो त्यात उतरेल तर भव्यच करेल, असंही त्याच्या आजूबाजूचे लोक सांगतात. आता मुंबईच्या जगात येऊन पंढरीच्या वारीचं इतर भाषांमध्ये डबिंग, आपला सिनेमा अशी अनेक स्वप्नं त्याच्या डोळ्यात आहेत.

जिद्द आणि ध्यास या दोन गोष्टी माणसाला फार वेगळं बनवतात. निशांतसमोर अनंत अडचणी आहेत. पण तो त्यातून मार्ग काढून एकेक पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकतोय. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलंय असं म्हणणारे अनेकजण आहेत. पण त्याचं आयुष्य शून्याच्याही खाली, मायनसमध्ये होतं... त्या एका सिनेमामुळे आम्ही होत्याचे नव्हते झालो, असं सांगताना त्याच्या चेहर्‍यावर नव्हत्याचे आहे करण्याची तयारीही दिसून येते. त्याचे सांगतात,, मित्र सांगतात, जाऊदे हे सिनेमाचं वेड, सोडून दे... पण तो त्या वाटेवर चाललाय, कुणी सोबत आलं तर त्यांना घेऊन, नाहीतर एकटाच... पण हे करायचंच एवढंच त्याच्या डोक्यात पक्कं आहे...

निशांत असाच आहे... एखाद्या लहान मुलासारखा त्याचा स्वभाव निरागस आहे... पण त्याच्या आत एक हिरा आहे. या हिर्‍याची चमक अजून जगाला दिसायचीय, ती कधी ना कधीतरी दिसेलच हा विश्वासही कायम आहे. मला गवसलेल्या या हिर्‍याकडून मी बरंच शिकलेय, शिकतेय... म्हणूनच मी त्याला कोंदणात ठेवलाय!











1 टिप्पणी: