प्रिय सानिया,
It’s a female
child... असं तो अॅनेस्थेटिस्ट येऊन माझ्या कानात कुजबुजला तेव्हा मला आॅपरेशन
टेबलवरच चार उड्या माराव्या असं वाटलं होतं. त्या घटनेला आज नऊ वर्षं झाली. पण ती
कालपरवाच घडल्यासारखी वाटते. ही नऊ वर्षं कडूगोड आठवणींचं एक युग आहे. पण आपण
त्यातूनही पार पडलो आहोत आणि नवीन आव्हानांचा सामना करायला तयार आहोत.
तुझा जन्म थोडा प्रतिकूल परिस्थितीतच
झाला. तुझ्या जन्माआधी काही दिवस माझं ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यामुळे सततच्या
गोळ्या, टेस्ट यांनी हैराण झाले होते मी. रात्री दोन-दोन वाजता मला गाढ झोपेतून
उठवून नर्स हातात झोपेची आणि बीपीची गोळी द्यायची आणि म्हणायची, पहिल्यापासून
झोप... तेव्हा आम्ही दोघी खीखी करून हसत बसायचो... तेही आठवतं. आपल्याला
हाॅस्पिटलमध्ये जी रूम मिळाली होती ती दुसऱ्या मजल्यावर होती. तिथून माझ्या
बेडसमोरची खिडकी उघडली की समोर रस्ता, रस्त्याच्या पलीकडे इंदिरा डाॅक, त्या
डाॅकमध्ये असलेली जहाजं आणि अथांग समुद्र. सुसाट वारा यायचा. तो खारा वारा खात,
डाॅकमध्ये दिवसच्या दिवस थांबलेली, सामानाची चढउतार करणारी जहाजं पाहणं मला खूप
आवडायचं. आपण अनादि काळापासून इथेच उभे आहोत आणि अनंतापर्यंत इथेच उभे राहू शकतो,
असं वाटायचं.
तुझ्या जन्माच्या दिवशी अमावस्या होती.
त्यामुळे सिझरच करायचं तर रात्री बारानंतर करावं असं काहीजणांचं म्हणणं होतं. पण
तुझा श्वास कोंडत होता आत. डाॅक्टरांनी साफ नकार दिला आणि अमावस्येच्या दिवशीच तू
जन्माला आलीस आणि माझ्या आयुष्यात पौर्णिमेचा चंद्र उगवावा तसं लख्ख चांदणं पडलं. तेव्हापासूनच
तुला संघर्षाचे धडे मिळाले असं मला नेहमी वाटतं.
त्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या
रेसिडेंट डाॅक्टर्सचा संप सुरू झाला होता. आपण होतो सेंट जाॅर्ज हाॅस्पिटलमध्ये.
माझी काळजी घेणाऱ्या सीनियर रेसिडेंट तुझी वाट बघत होत्या. पण त्या संपावर गेल्या
आणि आता आॅपरेशन कोण करणार हा प्रश्न उभा राहिला. सीनियर डाॅक्टर्सनी ही जबाबदारी
घेतली. सगळ्या डाॅक्टर्सना कुठूनकुठून गोळा केलं आणि रात्री आॅपरेशन पार पडलं. त्यानंतर
मी आठ-नऊ दिवसतरी हाॅस्पिटलमध्येच होते. तेव्हाही संप सुरूच होता. पूर्ण हाॅस्पिटल
भयाण दिसत होतं. मोठंच्या मोठं काॅरिडाॅर, उंचच उंच दगडी भिंती, वाॅर्डमध्ये पेशंट
नाहीत. कुणीही नाही. मी घाबरून जायचे. रूईची आजी असायची सोबतीला. तिचा हात पकडून
रात्री जागत बसायचे. रात्रीबेरात्री सगळ्यांची नजर चुकवून त्या सीनियर रेसिडेंट
मुली तुला बघायला यायच्या आणि खुसखुसत बसायच्या.
आॅपरेशनला जायच्या थोडावेळ आधी मी आणि
तुझा बाबा बोलत बसलो होतो. मी त्याला म्हटलं की, मला सगळं फिल्मी वाटतंय. तू मला
स्ट्रेचरवर टाकून घेऊन चाललायस. मला आतमध्ये नेतात. तू त्या ओटीच्या काचेतून बघत
अस्वस्थ येरझाऱ्या घालतो आहेस. ढँटडॅण... त्यावर तो म्हणाला, मला एवढा घाम फुटलाय
आणि तू मस्करी करतेस? तुला काय वाटतं का? घाबरले तर मीही होतेच. पण भीती
घालवायलाही हवीच होती. ओटीच्या बाहेर आले तेव्हा तुझे मुंबईचे आजोबा घामाघूम होऊन
बसले होते. आजीपण शांत बसून होती. पार्ल्याच्या आजीने जपमाळ हातात घेतली होती.
तुझा बाबा मी म्हटलं तसाच फिल्मी स्टाइलमध्ये येरझाऱ्या घालत होता. आत जाताना
वाटलं होतं की यांना मी परत पाहू शकीन की नाही... तेही आठवतं.
मला तू पहिल्यांदा दिसलीस ती
पेडिअॅट्रिशनच्या हातात. माझ्या डोळ्यांवर पट्टी ठेवलेली होती. समोरचं काही दिसत
नव्हतं. पण आजूबाजूचं बघू शकत होते. अॅनेस्थेटिस्ट माझ्याशी बोलत, मला शांत करत
बसला होता. आॅपरेशन सुरू असताना माझा सतत चढता बीपी त्याला टेन्शन देत होता. मग
अचानक मला पोटात काहीतरी हालचाल जाणवली. त्यानंतर तू दिसलीस. कोळणी एक मोठ्ठी
सुरमई शेपटाकडून पकडतात ना तसं तुला उलटं पकडलं होतं. तू लगेच कुडकुडलीस आणि
मोठ्ठा भ्यँ पसरलास. मग तुला ट्रेमध्ये ठेवलं आणि बाजूच्या खोलीत नेलं. मला
उत्सुकता लागली. अॅनेस्थेटिस्टला विचारलं.. काय आहे?
तो म्हणाला, बघून येतो हं आणि येऊन
कुजबुजला. It’s a female child... मी खूश. वाटलं, डाॅक्टरला म्हणावं, मला
आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. फाटक्या पोटाने मी बाहेर जायला तयार आहे. पण तिकडे
डाॅक्टर ओरडत होते. बीपी का वाढलाय? तू गप्पा काय मारतेयस? मग गप्प बसावं लागलं. पण
माझा आनंद त्यांनाही कळला होताच.
आज नवव्या वाढदिवसाला मी तुला तुझ्या
जन्माच्या गोष्टी सांगतेय. कारण ही एक गोष्ट आहे जी तुला कधीच आठवणार नाही. तू
आमच्यासाठी काय आहेस, हे सांगण्यासाठी हे पत्र आणि असंच एक पत्र यापुढे मी तुला
प्रत्येक वाढदिवसाला लिहिणार आहे. तू खूप मोठी व्हावीस, असं सगळ्याच आईवडिलांप्रमाणे
मलाही वाटतं आणि तुझ्या बाबालाही. अर्थात लौकिकार्थाने तर होशीलच पण खूप प्रवास
कर, खूप वाच, छान गाणी ऐक, जंगलात जा, समुद्राच्या तळाशी जा, आकाशाला गवसणी घाल,
व्यायाम कर, आनंदी राहा. आयुष्य खूप संघर्षाचं आहे, पण तितकंच सुंदरही आहे. लक्षात
ठेव- You are the shining star on my yelda!
Love you
Mom.
