रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

बिनओळखीची ओळख- १

आपल्या आयुष्यात रोजच्या रोज काही ना काही निमित्तांनी माणसं येत असतात. त्यातली सगळीच काही आपल्या लक्षात राहत नाहीत. पण काही माणसं मात्र विसरता विसरली जात नाहीत. कुछ खास है, असं लक्षात राहतं. कधी कधी ती आपल्या आयुष्यावर एक ठसा उमटवतात, कधी वेगळंच काहीतरी शिकवून जातात... जे कदाचित आपल्याला कधीच कळलं नसतं. त्यातल्या काहींची नावं आपल्याला माहीत असतात, काहींची नसतात... अनेकांचा चेहराही आपण पाहिलेला नसतो, पाहिला असला तरी आपल्याला पुन्हा तो ओळखता येणार नसतो. मग ही बिननावाची, बिनचेहर्‍याची माणसं लक्षात का बरं राहतात? नुसती लक्षात राहत नाहीत तर रुतून बसतात. असं का बरं होत असावं? हे कोडं मला आजही उलगडलेलं नाही. तर अशाच काही माणसांची ओळख पटवण्याचा प्रयत्न मी करतेय...

सुट्टीच्या दिवशी चौपाटीला गेल्याशिवाय दिवस पार पडत नाही. काही दिवसांपूर्वी असाच एक चौपाटीचा दिवस उजाडला. आम्ही मायलेकी एका मित्राला सोबत घेऊन टॅक्सीत स्वार झालो. जाताना नेहमीच्या कळकट्ट, तोंडात पानाचा तोबरा भरलेल्या, घामाने थबथबलेल्या, भैयाने आम्हाला आमच्या इच्छित स्थळी नेऊन टाकलं. येताना मात्र आम्हाला एक मराठमोळा टॅक्सीवाला भेटला. हसरा चेहरा आणि वेलकम असा भाव असलेला हा टॅक्सीवाला कुणाचंही स्वागत करण्यासाठी उत्सुक असावा असाच वाटत होता.

टॅक्सीत बसल्यावर आम्ही मराठी आहोत हे त्याच्या लक्षात आलं. पुढे ग्रॅण्ट रोडजवळच्या नवजीवन सोसायटीजवळ आम्ही सिग्नलला थांबलो होतो. तेव्हा त्याने बोलायला सुरूवात केली. तिथपासून घरी पोहोचेपर्यंत तो बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो. त्याच्या साध्याच आयुष्याची, साध्याच स्वप्नांची गोष्ट... नवजीवन सोसायटीकडे हात दाखवून म्हणाला, मी इथे काम करत होतो. आत्ता वर्षभरापूर्वीच ही टॅक्सी घेतली आणि नोकरी सोडली. म्हटलं सगळे धंदे भैयांनीच का करायचे? आपल्यात असं काय कमी आहे म्हणून आपण व्यवसाय करायचा नाही? पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमधून इथे आलो, ते काय असंच जगायला? ते आपलं नशीब आजमावून बघतात तर आपण का नाही पाहायचं?

इथे मी ड्रायव्हरची नोकरी करायचो. आठेक हजार पगार होता. पण आठ हजारात काय भागतं हो? घराचं भाडं, संसार, बायको, दोन मुली, त्यांची शिक्षणं... कसं परवडणार होतं. टॅक्सी घ्यायचा विचार मागची सात-आठ वर्षं मनात होता. पण दरवेळी पैसे जमवायचो आणि काहीतरी निघायचं. मग टॅक्सी घ्यायचं स्वप्न तसंच राहायचं. मी सुट्टीच्या दिवशी भाड्याने टॅक्सी चालवायचो. पैसे कमी पडायचे म्हणून नाही तर स्वत:ची टॅक्सी घेतल्यावर हा धंदा कसा चालतो ते पाहायचं म्हणून. सगळे नियम, सगळं काही शिकून घेतलं. नीट प्लॅनिंग केलं आणि शेवटी टॅक्सी बुक केली. एक एजंट गाठला. त्याला दीड लाख रूपये द्यायचे होते. ते कुठून आणायचे? कसेबसे जमवले. शेवटी वीस हजार रूपये कमी पडत होते. भाच्याने एक शब्दही न विचारता ते अकाऊंटला जमा केले. टॅक्सी चार दिवस एजंटच्या दारात उभी होती. पूर्ण पैसे दिल्यावर हातात आली.

त्याआधी नोकरीत नोटीस दिलीच होती. नोकरी सोडली तेव्हा शेट लोक सोडत नव्हते. पण म्हटलं, तुम्ही पगारपण वाढवत नाही. मग कसं जमणार? नोकरी सोडताना भीती वाटत होती. म्हटलं, काही चुकत तर नाहीये ना? टॅक्सीचा धंदा चालला नाही तर कसं होणार? पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि धंद्यात पडलो. आता मनाप्रमाणे टॅक्सी चालवतो. शेटलोकपण त्याच्या कुणाला आणायचं असेल तर मला सांगतात. आता मला खूप बरं वाटतंय. स्वतःचा व्यवसाय असण्यातला आनंदच काही वेगळा आहे. नाही म्हणायला टॅक्सीला खर्च आहे. वर्षातून एकदा लायसन्स नव्याने घ्यावं लागतं, त्याला चार-पाच हजार खर्च आहे. बाकी गॅस वगैरेसाठी खर्च होतो. पण बचतही बरीच उरते, तो टॅक्सीचं आर्थिक गणित उलगडून सांगतो. अर्थात त्यात त्रासही खूप आहे. रोज रात्री कमरेचा आटा ढिला होतो. पण समाधानापुढे त्याचं काहीही वाटत नाही.

नवीन टॅक्सी कुणाच्याही हातात द्यायला भीती वाटते. आता ही जरा जुनी झाली की मग तिच्यावर ड्रायव्हर ठेवणार आहे. हळूहळू दुसरी टॅक्सी घेईन. मला आता स्वातंत्र्याची सवय झालीय. सुट्टीत गावी जायचं झालं तरी टॅक्सी घेऊन जातो. गाड्यांसाठी वाट पाहा, तिकिटं शोधा, काहीही करावं लागत नाही. टॅक्सीचं छोटं स्वप्नं वाटेल कुणालाही, पण माझ्यासाठी ते मोठं आहे आणि ते पूर्ण करण्यातला आनंदही वेगळाच आहे...

हा छोटा-छोटा आनंद कुणाच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण ठरतो नाही? ही अशीच माणसं आपल्याला आहे त्या परिस्थिती लढायला शिकवतात. जगण्यातला आनंद लुटायला शिकवतात, नाही का?

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

बाईने टाकलेला नवरा

परवा, मजल्यावर जोरजोरात भांडणं सुरू होती. कुणीतरी कुणाच्यातरी उखाळ्यापाखाळ्या काढत होतं. शेवटी एक छोटं निमित्त काढून चाललेली भांडणं टोकाला गेली. मग घरादाराचा उद्धार सुरू झाला. त्यात एका नवरा, घरदार स्थिर असलेल्या बाईने दुसर्‍या बाईला म्हटलं, अगं तू नवर्‍याने टाकलेली बाई आहेस. त्यामुळे तुला काहीच किंमत नाहीये समाजात. तेव्हा तू जास्त शहाणपणा न करशील तर बरं... हे ऐकताना वाईट तर वाटलंच पण मनात एक विचार आला, दरवेळी नवर्‍याने बाईला का टाकायचं,बाईने नवर्‍याला टाकल्याची कॅटॅगरी तयार झाली तर काय होईल? अर्थात आजही भारतीय समाजात पुरूषांनी घटस्फोट मागण्याचं प्रमाण कमी आहेच. पण अशीच एक कल्पना मनात आली. तर बाईने टाकलेला नवरा...

एपिसोड १
परवा ना, आमच्या मजल्यावर जोरदार भांडणं झाली. तो म्हणाला मला, तू ना बाईने टाकलेला नवरा आहेस. समाजात तुला काहीही किंमत नाही. तुझी लायकी काय आहे हे मला माहीत आहे. तेव्हा तू जास्त आवाजी (हा टिपीकल मुंबईकरांचा शब्द) करू नकोस. असलं काय काय बोलली ती बाई मला आणि माझ्या अंगावरच धावून आली. आता मला सांगा, माझ्या कपाळावर बायको नावाचं कुंकू नाही, घरात हा आधार नाही, हा काय माझा दोष आहे? मग मला असं सगळेजण का म्हणतात? माझ्या बायकोने मला टाकलं म्हणून मी काय जगायला नालायक ठरलो? बरं, ती बाई बोलली ती बोलली, पण अंगावर धावून आली. आता माझं रक्षण करायला बायको नाही म्हणून एकट्या पुरुषावर असं धावून यायचं, हे शोभतं का?... अशी तक्रार करणारे पुरूष मी इमॅजिन करून पाहिले.

एपिसोड २
कुणाचं तरी लग्न ठरवायला घरात बैठक भरली आहे. तोही जाऊन पोहोचला आहे कारण त्याच्या जवळच्या मित्राचं लग्न आहे. पुरुष आपापसात कुजबुजतात- तो ना, बाईने सोडलेला नवरा आहे. जराही लाज कशी नाही. कसा मानाने मिरवतोय बघा. मी तुम्हाला सांगतो, जोवर हा त्या घरात आहे, त्या घराचं कधीही चांगलं होणार नाही. इतका निर्लज्जपणा मी कधी पाहिला नव्हता... अपशकुनी मेला!

एपिसोड ३-
मुलांचं, घरातलं सगळं मलाच करावं लागतं. नोकरी करा, स्वैपाकपाणी करा, मुलांना सांभाळा, त्यांचं खाणंपिणं, शाळा, सगळी बिलं भरा... सग्गळं सग्गळं मला करावं लागतं. ती गेली एकटी मला टाकून... मागे वळून पाहिलंसुद्धा नाही. माझ्या एकट्याच्या जिवावर कसं सगळं चालणार? मला दिवसातून दहा वेळा घरातून बाहेर जावं लागतं. लोक काय म्हणतील? काय उंडगा माणूस आहे!

एपिसोड - ४

घरी मित्र येतात. सगळे बेडरूमपर्यंत घुसतात. माझं सामान वापरतात. दारू पितात, सगळ्ळं तस्संच टाकून जातात. पण मित्र आहेत ना! मला काहीच बोलता येत नाही. पण त्यांना कळत नाही? घरात बाई नाही याचा अर्थ त्यांनी मला काहीच प्रायव्हसी नाही असा घेऊ नये.

एपिसोड - ५

आमच्या ऑफिसमधली ती अमुक तमुक बाई ना माझ्याकडे अशी टक लावून बघत असते की काही विचारू नका. आता तर लक्षात आलंय की कॉलनीतल्या काही बायकापण माझ्याकडे असंच पाहत असतात. इतकी लाज वाटते! बायकोने टाकलेला नवरा असलो म्हणून काय झालं? मला काही इज्जत आहे की नाही? एकटा पुरूष आहे तर काय मी अव्हेलेबल आहे?


एपिसोड 6

आईबाबा आलेत. मी ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये इतकं काम असतं ना की यायला उशीर होतो. आईबाबांना वाटतं माझं कुणाशीतरी लफडं सुरू आहे. खरंतर माझं पुन्हा लग्न करण्याची इच्छा आहे. पण हा विषय त्यांनी काढला पाहिजे ना. बाईने टाकलेल्या नवर्‍याने आयुष्यभर एकटं राहावं. मुलांना वाढवावं. दुसरं लग्न म्हणजे त्यांच्यासाठी पाप. छे, आमच्या समाजात नाही बुवा असं दुसरं लग्न करत. असं सगळं बोलले मला. वर म्हणाले तुझं त्या कुणाशीतरी लफडं सुरू आहे हे कळत नाही का आम्हाला. एवढं लागलं ना ते मला. मी बिचारा काम करत असतो. कुणाला घरीसुद्धा बोलवत नाही की कुणाकडे जात नाही. कुणाबरोबर फिरतही नाही. पण त्यांना तसं वाटतं.

एपिसोड -६
माझं दुसरं लग्न झालंय. दुसरी बायको चांगली आहे, प्रेमळ आहे. घरचे कुणीच लग्नाला आले नाहीत. मित्रमैत्रिणींना माहीत आहे. पण सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे. पहिल्या बायकोने सोडून दिलेला नवरा आहे, दुसरं किती दिवस टिकवतो ते पाहायचं. खरंच असं आहे का?

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

मातृत्व आणि कर्तृत्व?

गणपतीचं सान्निध्य असलेल्या तीनच स्त्रिया. विविध रूपांमध्ये वावरणारी त्याची आई-पार्वती आणि त्याच्या दोन बायका-सिद्धी आणि बुद्धी. पण कथांमधून, उत्सवांतून आठवण काढली जाते ती त्याच्या आईचीच. त्याच्या पत्नींच्या कथा काय आहेत, त्यांचं काय झालं? हे कळत नाही.. असं का व्हावं?

पार्वती ही हिमालयाची कन्या. शंकराशी लग्न व्हावं म्हणून तिने एक दिवस कोणतंही शिजवलेलं अन्न न खाता उपवास केला. केवळ फळांवर ती राहिली. फक्त तीच नाही तर तिची मैत्रीण (सखी) हिनेही तो उपवास केला. म्हणून हरताळकेचा उपवास आजही स्त्रिया करतात. पार्वतीला हवा तो नवरा मिळाला पण सखीचं पुढे काय झालं? तिला हवा तसा नवरा मिळाला की नाही, याचा उल्लेख कुठेही केलेला आढळत नाही. हरतालिकेच्या दुस-या दिवशी गणेश चतुर्थी आहे. पण याचा अर्थ गणेशाचा जन्म दुस-या दिवशी झाला असं नाही. ते शक्यही नाही. माघ महिन्यात असलेली गणेश जयंती हा खरा गणपतीचा जन्म मानला जातो. शिवाय वैशाख शुक्ल पौर्णिमेला गणपतीच्या एका अवताराचा जन्म झाल्याचं मानलं जातं. भाद्रपदातली गणेश चतुर्थी म्हणजे एका अर्थी पृथ्वीचं पूजन. या दिवशी पार्थिव गणेशाची (मातीच्या मूर्तीची) पूजा केली जाते. म्हणजे शेतात पीक चांगलं यावं म्हणून पृथ्वीचं, म्हणजे स्त्रीशक्तीचंच पूजन होतं.

गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी या दोन बायका होत्या, असं म्हणतात. पण खरं तर त्यांची नावं सिद्धी आणि बुद्धी अशी आहेत, असं शिवपुराण सांगतं. त्या प्रजापित्याच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुली. गणेश आणि त्याचा भाऊ स्कंद (कार्तिकेय) या दोघांपैकी जो कुणी पहिला सात वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करील त्याचं लग्न आधी केलं जाईल, अशी अट शंकर-पार्वतीने घातली. स्कंद प्रदक्षिणा करायला गेला पण गणपतीने मात्र आंघोळ करून आईवडिलांनाच सात प्रदक्षिणा घातल्या. आईवडिलांनी विचारल्यावर त्याने सांगितलं की, त्याची पृथ्वीप्रदक्षिणा झालेली आहे. हे दोघेही आपल्यासाठी धर्मरूप आहेत, त्यामुळे आपण प्रदक्षिणा पूर्ण केल्याचं त्याने म्हटलं. शिव-पार्वतीने त्याच्या लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर प्रजापतीला ही गोष्ट कळली. त्याने आपल्या मुली सिद्धी आणि बुद्धीच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. तो मान्य झाला. गणेशाला या दोघींपासून अनुक्रमे क्षेम आणि लाभ ही मुलं झाल्याची कथा आहे. या दोघींबाबत इतर काहीही उल्लेख सापडत नाहीत. सिद्धिविनायकासारख्या काही मूर्तीच्या मांडीवर वा शेजारी या दोघी बसलेल्या दिसतात पण त्याबद्दल फार काहीही माहीत नाही. कोकणातल्या कुणकेश्वर मंदिराच्या आवारात गणपती आणि त्याचं कुटुंब यांची एक मूर्ती दिसते.

गणपतीवर ख-या अर्थानं प्रभाव टाकणारी स्त्री म्हणजे त्याची आईच, असं अनेक कथांमधून दिसतं. ‘आईवडील हेच माझं जग’ म्हणणारा गणपती, पार्वतीनं एकटीनंच गणपतीला घडवल्याची कथा आणि गौरीची कथा.. या कथा आजच्या मुलांना सांगितल्या जात असताना, ‘गणपती ममाज् बॉय होता ना?’ असं विचारल्यास दचकू नका!

हरताळकेच्या कथेप्रमाणे गौरीच्याही कथेशी गणपतीच्या सणाचा संबंध आहे. दक्षिणेत दंडकारण्यात तिथल्या स्त्रियांना राक्षसांकडून त्रास होत होता. हा त्रास दूर करण्यासाठी त्या पार्वतीला भेटल्या. पार्वतीने गणपतीला स्त्रियांचं सैन्य तयार करण्याचे आदेश दिले आणि या सैन्याला प्रशिक्षणही त्यानेच दिलं. मग तिनेच त्याला हे सैन्य घेऊन दक्षिणेतल्या वाईट शक्तींवर चाल करायला सांगितलं. तो दक्षिणेत आला तो दिवस गणेशचतुर्थीचा. पण तिला त्याची काळजी वाटू लागली. मग ती स्वत:चं सैन्य घेऊन दक्षिणेत आली. ती स्वत:च आल्यावर दक्षिणेतल्या स्त्रियांनी तिला स्थानिक भाज्या खाऊ घातल्या. किनारपट्टीत गेल्यावर तिला माशांचाही स्वैपाक वाढण्यात आला. गौरीला या स्त्रियांच्या अगत्यामुळे माहेरी आल्याचा आनंद झाला.

मात्र गणेश जयंती असो की गौरीच्या सणाआधी येणारी गणेशचतुर्थी, गणपतीच्या कोणत्याही सणा-उत्सवाशी त्याच्या पत्नींचा काहीही संबंध नाही? गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस गणपतीकडे बुद्धी आणि सिद्धी अशी कृपा मागण्याचा उत्सव साजरा होत असतो, तेव्हा त्या दोघींना पूजेतलं स्थान नसतं. बुद्धी-सिद्धीचा निराळा उत्सवही कुणी कधी करत नाही. ‘ब्रह्मदेवाच्या मुली.. गणपतीच्या पत्नी’ आणि फार तर ‘क्षेम- लाभ यांच्या माता’ एवढीच त्यांची ओळख उरते! पार्वतीची पूजा गणपतीच्या उत्सवात होते, यामागे केवळ तिचं मातृत्व हे कारण मानायचं, की तिच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्याचा हा उत्सव मानायचा?