मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

हिंडेनबर्ग- फॅन्टसीहून अदभुत सत्यघटना

हिस्ट्री चॅनलसाठी डाॅक्युमेंटरीचं काम सुरू होतं. अचानक हमीदचा फोन आला.
मॅडमजी, एक हिन्डेनबर्ग का डाॅक्युमेंटरी आया है, क्या आप करना चाहेंगी.
नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
पण हिंडेनबर्ग म्हणजे काय, झेपलिन म्हणजे काय हे मला त्यावेळी अजिबात माहीत नव्हतं. डाॅक्युमेंटरी येईपर्यंत गुगलबाबाचा आधार घेऊन तिचा अभ्यास करून ठेवला. पण ती पाहिल्यावर तिने मला खिळवूनच ठेवलं. अतिशय गूढ आणि तरीही अचंबित करणारी, अदभुत घटना ती आणि त्या घटनेभोवती जर्मन तसंच ब्रिटनमध्ये असलेलं वादळ... असत्य वाटणारी ही सत्यकथा...
वर्ष 1937. पहिलं महायुद्ध संपून दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या थोडा आधीचा काळ. प्रवासी विमानं नुकतीच सुरू झाली होती. हा काळ हिटलरच्या नाझीवादाचा. विमानं हायड्रोजनवर चालायची तेव्हा.

फिल्म सुरू झाली ती ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये. न्यू जर्सीतल्या नेव्हल बेसवर सगळेजण झेपलिनच्या दुसऱ्या वर्षानिमित्त पहिल्यांदाच अॅटलांटिक ओलांडून येणाऱ्या हिंडेनबर्गची वाट बघत आहेत... एक मोठं वादळ घोंघावत असल्याने विमान बराच काळ लेट आहे. रेडिओसाठी पत्रकारिता करणारा हर्बर्ट माॅरिसन टेलिग्रामने रेडिओला आंखो देखा हाल सांगतो आहे... सगळे आतुर आहेत. विमानातले प्रवासी चित्रविचित्र. काही लहान मुलंसुद्धा या प्रवासाला आली आहेत. या विमानाचं तिकीट महागडं. त्यामुळे फक्त श्रीमंती चैन.
अचानक विमान येतं. हे आजच्या सुपरसाॅनिक किंवा जेट विमानांसारखं नाही. दोर खाली सोडले जातात. खाली तो दोर ओढायला लोक तयारच असतात. विमानाला परतीची घाई असते कारण ते परतीसाठीही उशिरा निघणार असतं. दोराला हात लावताच विमानाचा स्फोट होतो आणि त्याची पापणी लवेपर्यंत राखरांगोळी होते.

हे सगळं बघत असताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला.

त्यानंतर फिल्ममध्ये सुरू होतात ती चौकशी आणि तर्कवितर्काची वादळं. जर्मन फील्ड मार्शल पाॅल व्हाॅन हिंडेनबर्ग याच्या गौरवार्थ या विमानाला त्याचं नाव दिलं गेलं होतं. कुणी म्हटलं की हा नाझींनी घातपात केला, कुणी म्हटलं की ब्रिटनने काही केलं, कुणी म्हटलं की अमेरिकेने घात केला... कुणी काय तर कुणी काय...

पण एका माणसाला नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज आला होता. त्याचं नाव होतं पाॅल व्होन झेपलिन. त्याने अमेरिकेत येऊन केलेली चौकशी आणि लावलेला निष्कर्ष अदभुत आणि निव्वळ पाहण्याजोगा आहे.

शेवटी त्याने असा निष्कर्ष काढला की हिंडेनबर्ग आलं तेव्हा एक मोठं वादळ येऊन गेलं होतं म्हणून त्याला उतरायची परवानगी दिली गेली. पण त्याचवेळी एक छोटं वादळ आलेलं होतं. त्या वादळामुळे आतल्या हायड्रोजनच्या टाकीला चीर गेली होती. पण हे वादळ विमानाला झालेल्या उशिरामुळे कुणाच्या लक्षात आलं नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष झालं असावं.  त्याचवेळी दोर खाली टाकले गेले आणि जमीन ओली असल्यामुळे विद्युतस्थैतिक वीज (इलेक्ट्रोस्टॅटिक) जमिनीत लवकर थेट गेली नाही. विमानाला उशीर झाला होता. त्या घाईत खालच्या लोकांनी दोर धरल्यामुळे विजेचं सर्किट पूर्ण झालं आणि आग लागली.

पण हा निष्कर्ष कुणीही मानायला तयार नव्हतं. प्रत्येकाला काही ना काही फॅन्टसी हवी होती. झेपलिन यांच्या या निष्कर्षावर खूप टीका झाली. पण त्यांनी आपला हा निष्कर्ष कायम ठेवला. त्यांचा अमेरिकन नेव्ही अधिकारी असलेला मित्र रोसनडेन्हही त्यांच्यावर नाराज झाला.

या फिल्मच्या शेवटी झेपलिन तार ओलांडून पलीकडे जातात आणि रोसेनडेन्ह त्यांना आपण युद्धानंतर जगलो तर भेटू अशा अर्थाचं काहीतरी सांगतो... हे दृश्य
पाहताना आत आत खोल काहीतरी हलत होतं. नेमकं काय ते सांगू शकणार नाही.
या डाॅक्युमेंटरीने माझ्या मनावर मोठा परिणाम केला. आपल्याला युद्धकथा वाचायला आणि पाहायला आवडतात हे कळलं... ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट.
काही काही सत्यकथा फॅन्टसीहूनही अदभुत आणि विस्मयकारक, अविश्वसनीय असतात. हिंडेनबर्ग त्यातलीच एक. 

२ टिप्पण्या: