मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

बाईने टाकलेला नवरा

परवा, मजल्यावर जोरजोरात भांडणं सुरू होती. कुणीतरी कुणाच्यातरी उखाळ्यापाखाळ्या काढत होतं. शेवटी एक छोटं निमित्त काढून चाललेली भांडणं टोकाला गेली. मग घरादाराचा उद्धार सुरू झाला. त्यात एका नवरा, घरदार स्थिर असलेल्या बाईने दुसर्‍या बाईला म्हटलं, अगं तू नवर्‍याने टाकलेली बाई आहेस. त्यामुळे तुला काहीच किंमत नाहीये समाजात. तेव्हा तू जास्त शहाणपणा न करशील तर बरं... हे ऐकताना वाईट तर वाटलंच पण मनात एक विचार आला, दरवेळी नवर्‍याने बाईला का टाकायचं,बाईने नवर्‍याला टाकल्याची कॅटॅगरी तयार झाली तर काय होईल? अर्थात आजही भारतीय समाजात पुरूषांनी घटस्फोट मागण्याचं प्रमाण कमी आहेच. पण अशीच एक कल्पना मनात आली. तर बाईने टाकलेला नवरा...

एपिसोड १
परवा ना, आमच्या मजल्यावर जोरदार भांडणं झाली. तो म्हणाला मला, तू ना बाईने टाकलेला नवरा आहेस. समाजात तुला काहीही किंमत नाही. तुझी लायकी काय आहे हे मला माहीत आहे. तेव्हा तू जास्त आवाजी (हा टिपीकल मुंबईकरांचा शब्द) करू नकोस. असलं काय काय बोलली ती बाई मला आणि माझ्या अंगावरच धावून आली. आता मला सांगा, माझ्या कपाळावर बायको नावाचं कुंकू नाही, घरात हा आधार नाही, हा काय माझा दोष आहे? मग मला असं सगळेजण का म्हणतात? माझ्या बायकोने मला टाकलं म्हणून मी काय जगायला नालायक ठरलो? बरं, ती बाई बोलली ती बोलली, पण अंगावर धावून आली. आता माझं रक्षण करायला बायको नाही म्हणून एकट्या पुरुषावर असं धावून यायचं, हे शोभतं का?... अशी तक्रार करणारे पुरूष मी इमॅजिन करून पाहिले.

एपिसोड २
कुणाचं तरी लग्न ठरवायला घरात बैठक भरली आहे. तोही जाऊन पोहोचला आहे कारण त्याच्या जवळच्या मित्राचं लग्न आहे. पुरुष आपापसात कुजबुजतात- तो ना, बाईने सोडलेला नवरा आहे. जराही लाज कशी नाही. कसा मानाने मिरवतोय बघा. मी तुम्हाला सांगतो, जोवर हा त्या घरात आहे, त्या घराचं कधीही चांगलं होणार नाही. इतका निर्लज्जपणा मी कधी पाहिला नव्हता... अपशकुनी मेला!

एपिसोड ३-
मुलांचं, घरातलं सगळं मलाच करावं लागतं. नोकरी करा, स्वैपाकपाणी करा, मुलांना सांभाळा, त्यांचं खाणंपिणं, शाळा, सगळी बिलं भरा... सग्गळं सग्गळं मला करावं लागतं. ती गेली एकटी मला टाकून... मागे वळून पाहिलंसुद्धा नाही. माझ्या एकट्याच्या जिवावर कसं सगळं चालणार? मला दिवसातून दहा वेळा घरातून बाहेर जावं लागतं. लोक काय म्हणतील? काय उंडगा माणूस आहे!

एपिसोड - ४

घरी मित्र येतात. सगळे बेडरूमपर्यंत घुसतात. माझं सामान वापरतात. दारू पितात, सगळ्ळं तस्संच टाकून जातात. पण मित्र आहेत ना! मला काहीच बोलता येत नाही. पण त्यांना कळत नाही? घरात बाई नाही याचा अर्थ त्यांनी मला काहीच प्रायव्हसी नाही असा घेऊ नये.

एपिसोड - ५

आमच्या ऑफिसमधली ती अमुक तमुक बाई ना माझ्याकडे अशी टक लावून बघत असते की काही विचारू नका. आता तर लक्षात आलंय की कॉलनीतल्या काही बायकापण माझ्याकडे असंच पाहत असतात. इतकी लाज वाटते! बायकोने टाकलेला नवरा असलो म्हणून काय झालं? मला काही इज्जत आहे की नाही? एकटा पुरूष आहे तर काय मी अव्हेलेबल आहे?


एपिसोड 6

आईबाबा आलेत. मी ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये इतकं काम असतं ना की यायला उशीर होतो. आईबाबांना वाटतं माझं कुणाशीतरी लफडं सुरू आहे. खरंतर माझं पुन्हा लग्न करण्याची इच्छा आहे. पण हा विषय त्यांनी काढला पाहिजे ना. बाईने टाकलेल्या नवर्‍याने आयुष्यभर एकटं राहावं. मुलांना वाढवावं. दुसरं लग्न म्हणजे त्यांच्यासाठी पाप. छे, आमच्या समाजात नाही बुवा असं दुसरं लग्न करत. असं सगळं बोलले मला. वर म्हणाले तुझं त्या कुणाशीतरी लफडं सुरू आहे हे कळत नाही का आम्हाला. एवढं लागलं ना ते मला. मी बिचारा काम करत असतो. कुणाला घरीसुद्धा बोलवत नाही की कुणाकडे जात नाही. कुणाबरोबर फिरतही नाही. पण त्यांना तसं वाटतं.

एपिसोड -६
माझं दुसरं लग्न झालंय. दुसरी बायको चांगली आहे, प्रेमळ आहे. घरचे कुणीच लग्नाला आले नाहीत. मित्रमैत्रिणींना माहीत आहे. पण सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे. पहिल्या बायकोने सोडून दिलेला नवरा आहे, दुसरं किती दिवस टिकवतो ते पाहायचं. खरंच असं आहे का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा